Wednesday, January 8, 2014

गोंदेश्वर मंदिर


शिल्पकलेचा एक अद्भुत आविष्कार म्हणावे लागेल इतके सुंदर सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर आहे. मंदिरात मनाला एक वेगळी शांती मिळते.  विशेषतः पहाटे आणि दुपारच्या वेळी मंदिरात राबता कमी असतो. हि मंदिराला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे असे माझे मत आहे.
मंदिरात जाण्यासाठी प्रथम सिन्नर गाठावे. सिन्नर -शिर्डी रोडवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डावीकडील वाट धरावी. पाचच मिनिटात आपण मंदिर परिसरात येवून पोहोचतो.

मंदिराचा आवार तसा मोठा आहे. मुख्य मंदिराभोवती सुर्य, पार्वती, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत. या चारही मंदिरांची रचना जवळपास समान आहे पण जवळून पाहिल्यास फरक लक्षात येतो. मुख्य मंदिरा समोर नंदी आहे.  हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. असा हा मंदिराचा विशाल विस्तार आहे.
सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराला ३ प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या प्रकाशामुळे कोरीवकाम केलेल्या भिंती व खांबांच्या वेगवेगळ्या छटा पाहण्याजोग्या आहेत.
हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.
संरक्षित स्मारक असूनही मंदिराकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत राहते. गाभाऱ्याची दुर्दशा,  सभोवतीची अस्वच्छता , पालापाचोळा मंदिराच्या आवारातच जाळणे, रिकामटेकड्यांचा हैदोस यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आहे.
































No comments:

Post a Comment