Thursday, April 4, 2013

पांडवलेणी, नाशिक

पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेनसातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.


यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रीयांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपुर्ण सुस्थितीत आहे. पुर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.


तसेच काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहीलेले दिसून येते.
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते. या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे


पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृष्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायर्‍यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.


स्थळ: बुद्ध स्मारक नाशिक.ठिकाण: पांडवलेणी पायथ्यापाशी (नाशिकपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर, मुंबई रस्ता)जाण्यासाठी नाशिकच्या निमाणी बस-स्थानकावरून दर २० मिनिटांनी ’पांडवलेणी’ बस जाते

नासिक लेण्यांतील महत्वाची अशी सातवाहनांची देवीलेणी आणि क्षत्रपांचा नहपान विहार सुरुवातीला पाहून मग इथल्या चैत्यगृहाकडे निघालो.
महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणेच इथेही एकमेव चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना. पिंपळपानाकृती कमान हे सर्वच चैत्यगृहांचे वैशिष्ट्य. गौतम बुद्धाला गयेत अश्वस्थ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक म्हणून ही रचना कोरली जाते.
इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.

रञोअमस अरहलयस चालिसलनकस दुहुतुया महाहकुसि-
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित

याचा अर्थ
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.


भट्टपालिका ही नाणेघाटात उल्लेख आलेल्या नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. याचा अर्थ हे चैत्यगृह क्षत्रप व गौतमीपुत्राच्या आधीचे.

चैत्यगृहात १६ सालंकृत खांबावर तोलले गेलेले गजपृष्ठाकृती छत, मधोमध वाटोळा गुळगुळीत स्तूप, स्तूपाची हर्मिका. इथे छताला लाकडी फासळ्या शिल्लक नाहीत पण त्यांच्या खाचा त्यांचे पूर्वीचे अस्तित्व दाखवतात. खांबांवरही काही शिलालेख कोरलेले आहेत.



या सर्व शिल्पांच्या बरोबरीने ब्राह्मी लिपीतले लेखही आपल्याला दिसत असतात.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.

सिधम सकस दमचिकस लेखकस वुधिकस
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा

शक दमचिकाचा लेखक आणि दशपुराचा रहिवासी विष्णुदत्ताचा पुत्र वुधिकाने एक लेणे आणि दोन पाण्याची टाकी पैकी एक आपल्या माता पितरांसाठी (भेट)दिले आहे

लेणी शब्दाचे प्राचीनत्व इथे दिसून येते. पोढि म्हणजे पाण्याची टाकी त्याचाच अपभ्रंश होऊन (पाण)पोई असा आजचा शब्द रूढ झाला. लेखक ह्या शब्दाचा उल्लेखही येथे महत्वाचा आहे.

अजून एका शिलालेखात यवनांचा पण उल्लेख आला आहे.

सिधम उतरहासा दमतमितियकस योनकस धम्मदेवपुतस इदग्निदतस धम्मतमा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता

उत्तरेतील दंतमित्रीचा रहिवासी, धर्मदेवाचा पुत्र, यवन इंद्राग्निदत्त याने त्रिरश्मी पर्वतावरील एका चैत्यगृहानजीकच्या लेण्यात माता पितरांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी खोदलेली आहेत. आणि हे लेणे सर्व बौद्धांच्या पुजेसाठी चार दिशांनी आलेले बौद्धसंघां आणि त्याचा पुत्र धर्मरक्षित याने एकत्रितरित्या बांधले आहे.

यवन म्हणजे ग्रीक लोक. इथे येउन स्थायिक झालेल्या यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता हे यावरून सिद्ध होते.

अजूनही असे दातृत्वाचे बरेच शिलालेख या ठिकाणी आहेत.





 यज्ञविहारातील सिंहासनारूढ बुद्धमूर्ती

Pandav Leni Nasik

No comments:

Post a Comment