Friday, February 14, 2014

नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ( महाराष्ट्राचे भरतपूर )

संगमनेर- सिन्नर तसा दुष्काळी पट्टा, या भागात पाणथळ जमिनी आणि पक्षी अभयारण्य आहे असे सांगितल्यास कुणाल खरे वाटणारा नाही. सिन्नर पासून साधारण २५-३० किलोमीटर अंतरावर नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. सिन्नर पासून नांदुर मध्यमेश्वरची वाट दाखवणारा साधा एक दिशादर्शक फलक सुद्धा दिसत नाही.  चुकण्याची शक्यता जास्त, अशावेळी विचारात-विचारात गेलेले बरे.  नांदुर मध्यमेश्वर हे गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमावर बांधलेले धारण आहे. धरणाजवळ पाणथळ जमिनी व दलदलीचा प्रदेश आहे याच भागावर हे पक्षी अभयारण्य वसलेले आहे. वर्षभर हजारो स्थलांतरित पक्षी या भागाला भेट देतात. कीटक आणि मासे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने येथे पक्ष्यांच्या पंगतीच्या पंगती उठतात.
माफक शुल्कात शासनाने पार्किंग व निरीक्षण मनोऱ्यांची सोय केलेली आहे. त्यापैकी १-२ मनोरे काही दिवस पूर्णपणे पाण्यात असतात. गाईडची मदत घेऊन पक्ष्यांच्या जवळ जावून निरीक्षण करता येते. शासनाने खरेतर मोफत दुर्बिणींची सोय केली आहे मात्र त्या पैसे मोजून वापरण्यासाठी घ्याव्या लागतात. करकोचे, विविध प्रकारचे बगळे, खंड्या, पाणकावळे, बदके, कोतवाल, rice field pipit, टीटव्या, भारद्वाज इत्यादी देशी तसेच रोहित सारखे अनेक स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. पक्ष्यांबरोबरच पाणवनस्पती व कमळांच्याहि अनेक प्रजाती येथे पाहायला मिळतात.
गावातील काही हॉटेलांमध्ये चिकन म्हणून अभयारण्यातील बदकांच्या वापर केला जातो असे जेव्हा गुरख्यांकडून जेव्हा कळले तेव्हा वाईट वाटले. शासनाचे पर्यावरण विषयक अशामुळेच तर मागे पडत नसेल. शासनाचे सर्वच प्रयत्न व्यर्थ नाहीत का ?  अनेक पक्षिमित्र या भागाला भेट देतात. येथील गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे. पक्षी मुळातच भित्रे त्यात मोटारींच्या वर्दळीमुळे आणि गोंगाटामुळे भविष्यात येथील पक्ष्यांची संख्याही जर कमी झाली तर यात आश्चर्य करण्याचे कारण नाही.

























No comments:

Post a Comment