गारपिटीने शेतं झोडपून साधारण हफ्ताच लोटला असेल तोच सुर्य आग ओकायला लागला होता. सोनोरी(मल्हारगड) करून महिना झाला होता. पाय आणि कॅमेरा सळसळू लागला होता आणि डोक्यात पुढील ट्रेक चे विचारचक्र फिरू लागले होते. एखादी भटकंती तरी झालीच पाहिजे. शनिवारी संदीप ला कॉल केला येणार का ? लोकेशन ठीकस ठरलेलं नसतानाही गडी तयार झाला. दोघांनीच जायचे ठरलं. इतर कुणाला विचारण्याच्या फंदात दोघेही पडलो नाही. दोघेहि पुण्याहून घरीच (संगमनेर) आलो होतो त्यामुळे जवळची ठिकाणे म्हणजे अकोले किंवा जुन्नर. अकोले तालुक्यात यावर्षी १०-१२ वेळा जानं झालं होतं पण जुन्नर तालुका तितकासा परिचित नव्हता. लहान थोर ट्रेकर्सचा आवडता स्पॉट नाणेघाट, नाणेघाटाबद्दल तर ऐकून होतो पण तिथं जाण काही जमलं नव्हत. झालं एकमुखाने नाणेघाट तर फिक्स झाला पण हा काही ट्रेक म्हणण्याजोगा स्पॉट नव्हता मग जोडीला हडसर पाहण्याचं ठरलं.
रविवारचा दिवस मार्च अखेरचे दिवस होते. सकाळी ६ वाजता बाईकला तिचा खाऊ दिला आणि जुन्नरच्या दिशेने निघालो. उन्हाळ्याचे दिवस असूनही सकाळी हवेत गारवा होता. जसजसा सुर्य वर-वर जाऊ लागला तसतसा उकाडा वाढत होता. ८ वाजता जुन्नर मध्ये पोहोचलो. शिवनेरीच्या पायथ्या जवळच एका हॉटेल मध्ये मिसळ आणि चहावर मस्त ताव मारला आणि बाहेर आलो. उन मी म्हणत होतं. "टोपी पाहिजे होती राव" दोघेही एकमत झालो आणि टोपी खरेदीसाठी जुन्नर बाजारात शिरलो. दुकानं उघडली नव्हतीच पण शोध चालूच ठेवत पुढे सरकत होतो. एक दुकान सुदैवानं उघड दिसलं. लगेचच आत शिरलो आणि प्रश्न टाकला "टोपी आहे का ?". दुकानदाराने गांधी टोप्या समोर टाकल्या. संदेश आणि मी एकमेकांकडे पाहताच राहिलो. काही न बोलता थेट बाहेर पडलो आणि माणिकडोह फाट्याच्या दिशेने निघालो.
अर्ध्या तासात हडसर गावात येवून पोहोचलो. गावात बाईक लावून लगोलग गडाच्या दिशेने निघालो. १० मिनिट निलगीरी आणि आंब्याच्या सावलीतून चालत जाऊन शेतांमध्ये येवून पोहोचलो. हडसर किल्ला हा दोन डोंगरापासून बनलेला आहे. यापैकी डावीकडील भाग उजव्या भागापेक्षा लहान आहे. या दोन्ही भागांचे दोन बुरुज दोन्ही बाजूंनी संरक्षण करतात. या दोन्ही बुरुजांपासूनच गडावर प्रवेश करण्या करता मार्ग आहे. गडाच्या खालून दोन डोंगरांमधला बुरुज स्पष्ट दिसतो. तो समोर ठेवूनच शेत सोडून समोरचा रस्ता धरला. दगडांची रास पार करून झुडपांतून वाट शोधत वर चढत होतो. मध्ये घसारा आहे पाय जपूनच ठेवावा लागतो.
शेवटी एकदाचे बुरुजाच्या खाली येवून पोहोचलो. इथे थोडा अवघड प्याच पार करावा लागतो. तिथून वर आल्यावर आपण बुरुजावर येतो.
येथून डाव्या बाजूला वर चढून गेल्यावर एक उध्वस्त गणेश मंदिर आहे. मंदिरा समोरच एक नंदी आहे. पूर्वी येथे शिवमंदिर असावे. काळाच्या ओघात ते हरवले असावे. पुढे काही अंतरावर एक एक पाण्याचं टाकं आहे.
यापुढे पाहण्यासारखे काही नाही. येथून मागे वळावे. उजवीकडे गडाचा मुख्य भाग आहे. उजवीकडे येताच प्रथम कातळात कोरलेले प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वार सहजासहजी न दिसावे अशीच याची रचना आहे. कातळात खोदून काढलेली प्रवेशद्वारे हे हडसरचे एक वैशिष्ठ्य आहे. अजिंठा वेरूळ सारखी कलाकुसर येथे नक्कीच नाही पण दुर्गप्रेमींना नक्किच मोहात पाडावी अशी याची रचना आहे. दरवाज्यातून आत शिरताच डाव्याबाजूला पहारेकारांच्या देवड्या आहेत. सर्पिलाकार पायऱ्यांवरून पुढेजाताच गडाचा परिसर नजरेत भरतो.
वर चढून येताच पाण्याचं टाकं नजरेत भरत. येथून पुढे घरांचे अवशेष पाहायला मिळतात. पूर्वी गडावर बराच राबता असावा. घरांचे अवशेष पाहून पुढे येताच एक तलाव व पुष्करणी वजा टाकं आहे. तलावात बराच गाळ साठलेला असल्याने पावसाळ्यानंतर पाणी आटत.
तळयासमोरच एक शिवमंदिर आहे. हडसर गावातूनच हे मंदिर खुणावत असतं. मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. बहुदा गावकर्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला असावा. मंदिरात शिरताच घडीव गरुड, हनुमान व गणेशमूर्ती लक्ष्य वेधून घेतात. मंदिरात एक चौथी मूर्ती देखील आहे ती बहुदा राम-सीतेची असावी. गाभार्यात शिवलिंग आहे. मंदिर तसे प्रशस्थ आहे पाच सहा जण आरामात मुक्काम करू शकतात. मंदिराशेजारी एक टेकडी आहे हि गडावरील सर्वात उंच जागा. टेकडी वरून चावंड, शिवनेरी हरिश्चंद्रगड, नाणेघाटाजवळचा वर्हाडी डोंगर दिसतात.
टेकडीच्या बाजूने चालत राहिल्यास काही अंतरावर काही गुंफा आहेत. त्यांचा वापर धान्य किंवा दारुगोळा साठविण्यासाठी होत असावा.
येथून पुढे मात्र काही विशेष पाहण्यासारखे नाही. इथून मागे वळून आम्ही राजमार्गाने जाण्याचे ठरवले. राजमार्ग भलताच सुखकर आहे. साधारण १५० पायऱ्या उतरून आल्यावर गडाच्या डाव्या बाजूला पूर्ण गोल चक्कर मारावा लागतो. वाटेत कातळात खोदलेले २ टाके आहेत.
येताना ज्या गोष्टीची सुरवाती पासून भीती वाटत होती ती घडलीच. माकडांच्या टोळीने दर्शन दिले. पण फारसा त्रास त्यांनी दिला नाही. ती बिचारी आली तशी आपल्या मार्गे निघून गेली. यामार्गाने गडावरून खाली हडसर गावात येण्यास अर्धा तास पुरतो.
साधारण १२-१२:३० वाजता आम्ही हडसर गावात परतलो. आणि सरळ नाणेघाटात जाणारा रस्ता धरला. रस्त्याची अवस्था काय वर्णावी ? पाठीचा पार भुगा झाला. हडसर पासून साधारण १० किमी अंतरावर निमगिरी गाव आहे. हा आहे किल्ले निमगिरी.
निमगिरी |
चावंड |
अर्ध्या-पाऊन तासात घाटघर गाठले. वाटेत वर्हाडी डोंगर (भोरांड्याच दार) विशेष लक्ष्य वेधून घेतो.
जनावरांना सावलीसाठी केलेली हि तात्पुरती व्यवस्था.
घाटघर पासून नाणेघाट हाकेच्या अंतरावर आहे. नाणेघाटाच विस्तीर्ण पठार आणि डावीकडील जीवधन मन मोहून टाकतो. नाणेघाटाची माहिती कुठेही मिळेल त्याबदल्यात काही फोटू खाली पाहावेत.
जीवधन |
मध्ये सिद्धगड |
नाणेघाटाच्या नळीच्या डावीकडील उंच कडा म्हणजे नानाचा अंगठा. नानाच्या अंगठ्यावरून जीवधनची समुद्रसपाटी पासूनची उंची पाहून मन थक्क होते. येथून डावीकडे जीवधन सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड खाली मुरबाड उजवीकडे हरिश्चंद्रगड पाहता येतात.
नाणेघाट पाहून परतीच्या प्रवासाला लागायचं होत पण डोळ्यांची भूक भागवल्यानंतर पोटाला राग आला होता. थोडासा नाश्ता आणि गारीगार लिंबूपाणी पिवून जरा हुशारी आली. परत खड्ड्यात रस्ता शोधायचा होता. सह्याद्रीचे रौद्र-राकट रूप पाहून मळलेले कपडे - लाल झालेले डोळे - उन्हामातीने राठ झालेले केस - काळवंडलेले चेहरे आणि मनात असंख्य आठवणी घेवून परत येण्याचा वायदा करून घराकडे प्रयाण केले.
No comments:
Post a Comment